सांधण व्हॅली... प्रथम चरण
लिहायचं म्हटल कि सुरवात कुठुन करावी समोर येणारा पहिला यक्ष प्रश्न पण "सांधण व्हॅली" बद्दल लिहाताना हा प्रश्न सुद्धा गौण वाटतो...
कारण ह्या ट्रेक पर्यंत आम्ही सगळे अचानक भयानक मित्र मंडळाचे कार्यकर्ते होतो....ह्या ट्रेकने आम्हांला only ट्रेकर्स पासुन organising ट्रेकर्स बनवलं....
असोत.... मंदार भावे(हे एक अजब आणि वेगळ रसायन ह्याच्या बद्दल वेगळा लेखकच लिहावा लागेल)ह्याला सहजच विचारल की 'कुठे जाणार आहे का ट्रेकला?'त्याच उत्तर आल 'हो...आहे ना चल' झाल इथुन आमची सुरुवात कधी निघायचं,कस जायचं,काय ....घ्यायचं इ प्राथमिक सोपास्कारानंतर
मी,माझा मित्र अमोल कांबळे (हा फोटोग्राफर मित्र ह्याला 'तुला तिकडे भरपुर खुराक मिळेल' अस सांगुनच तयार केलेला.)आम्ही दोघेजण मंदारच्या घरी धडकलो...गेल्यानंतर पाहिलं तर एक लहान मुलगा श्रीराम,अजुन काही मुली रविशा,रचना,ग्रेशा,मेधा,अमृता,कस्तुरी,वर्षा आणि मी,अमोल,रोहन,योगीराज,अश्विन,तेजस,तेजस(माझा मामे भाऊ)आणि मंदार ,अजिंक्य,जय,अमोल हि मुलं आणि गेंगजे काका
असा सगळा आकडा १९-२० पर्यंत गेला...आणि बस आल्या वर नेहमीप्रमाणे सचिन शेठ आणि सुशांत शेवटी एव्हाना नरेंद्र दादा आणि माझा मामा (मंदार शिदोरे)ह्यांनी त्यांच्या कौतुकसोहळ्याचा पुर्वाध पुर्ण केलेला होता उत्तरार्ध ते आल्यावर झाला...
सर्व लवाजमा बस मध्ये चढवल्याची खात्री करुन नारळ फोडला आणि विघ्नहर्त्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर करुन बस व्हॅलीच्या दिशेने मार्गस्थ झाली...तळेगाव-नारायणगाव-आळेफाटा-बोटा-घोटी-राजुर-साम्रद असा प्रवास करत बस साम्रद गावात पोहोचली.
"साम्रद"गाव कल्पनेत असतं तसंच कौलारु बैठी घरे,गाय-म्हशींच वावरणे,सकाळच्या प्रहरी पाणी आणण्यासाठी बाया आणि पोरा-सोरांची लगबग,धुक्याची पांघरलेली गडद शाल,गवताच्या पेंढ्या,मचाण अस हे गाव...गावातल्या एका घरामध्ये आराम आणि नाश्ता करण्यासाठी म्हणुन थांबलो...आम्ही निसर्ग न्याहाळण्यात मग्न असताना बाकिचे आराम पडले पडले कसले अक्षरशः झोपले...
निसर्गाच ते रुप न्याहाळुन आणि आमच फोटोसेशन झाल्यानंतर नाश्ता करायच्या तयारीला लागलो...मंदारचा शनिवारी उपवास असतो तर हे बेण दुधावरच.हे दुध सुद्धा पावडर पासुन तयार केलेल्या... पोहे तयार झाले,आणि ते बाकिच्यांना ताटात देऊन आम्ही मात्र थाटात पोहे तयार केलेल्या पातेल्यातच खायला बसलो...खाताना तोंडी लावायला फरसाण,शेव,चिवडा,शेंगदाण्याची चटणी हे सगळं सचिन शेठच्या तिजोरीतुनच बाहेर येत होत...हा माणुस म्हणजे एक अतरंगी प्राणी कुठल्याही ट्रेकला आला तरी ह्याच कपडे इस्त्री केलेले आणि शर्ट ट्रेक संपेपर्यंत आत खोचलेला..
नाश्ता संपल्यानंतर आम्ही व्हॅलीच्या दिशेने प्रवास सुरु झाला... सुरुवातीची वाट भलतीच निमुळती वाटाव हा कुठला येवढासा ओढा आहे...साम्रद गावातून १० मिनिटात आपण सांदण व्हॅलीत प्रवेश करतो. जस जसे आपण पुढे पुढे जात होतो तस तसे दोन्ही बाजूंना असणारे कातळकडे जवळ जवळ येऊ लागले.त्यामूळे तयार झालेल्या अरूंद पात्रातून मार्गक्रमण करतांना काही ठिकाणी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. इथे साठलेल पाणी हे माझ्या छातीला म्हणजेच पाण्याची खोली साधारण ५.५ फुट होती.इथे वर्षाने श्रीरामला पाठीवर घेऊन साचलेल्या पाण्यातुन वाट ओलांडली.(पाण्याची खोली ट्रेक कुठल्या महीन्यात करतो त्यावर अवलंबून आहे.) सांदण व्हॅलीच्या या भागात नदीच्या पात्राची सरासरी रुंदी १० फूट तर पात्राच्या दोन्ही बाजूच्या कातळकड्यांची सरासरी उंची १५० फूट आहे. काही ठिकाणी हे कातळकडे वरच्य बाजूस एकमेकाला चिकटलेले आहेत.
१ ते १.५ तासांनंतर आम्ही पहिल्या टप्प्यापाशी येऊन पोहोचलो......
इथे मात्र साधारण ४५ ते ५० फुट उंचीचा एक कातळकडा होता...जो फक्त रोप(ROPE) लावुन उतरायचा होता.सर्व जण जमा झाल्यावर सर्वात आधी अजिंक्य ने उतरायच होत...त्या पाठोपाठ बाकिच्या लोकांनी उतराव अस ठरलं...अजिंक्य उतरला...त्यापाठोपाठ तेजस, सुशांत, मेधा,अश्विन,कस्तु,अमु,दोन्ही अमोल,योगीराज,रोहन,माझा भाऊ तेजस, आणि तेजस..अस करत करत रचना उतरायला लागली,रचना मात्र निम्यावर जाऊन अडकली...खाली उतरलेल्या लोकांनी रचना हि ३६०°मध्ये फिरत होती सांगितल... घाबरलेल्या रचनाने जिवाच्या आकातांने "मला वाचवा,मला वाचवा" अशी ओरड ठोकली....त्या वेळी मंदारने उतरुन तिला सोडवलं.आणि माझ्या मनात विचार आला "आयला!आपली सुद्धा पहिलीच वेळ"...मनात भितीची सणक डोक्यात गेली हात-पाय थंडी कुडकुडायला लागले.... ..त्यावेळी श्रीराम माझ्या कुशीत झोपला होता...
त्यानंतर मात्र माझी उतरायची वेळ आली...आणि माझ्या छातीत धडधडायला लागलं, "दुष्काळात तेरावा महिना" किंवा उपहासाच्या भावनेतुन "सोने पे सुहागा" अस म्हणायला हरकत नाही,
श्रीरामला मी पाठिवर घेऊन खाली उतरायच होतं,मग तर हवा टाईट ,पत्ते गुल अशी अवस्था झाली.मला आधीच्या लोकांना वर्षा व मंदारने दिलेल्या टिप्स मी मनातल्या मनात रिपीट करायला लागलो...वर्षाने हारनेस (HARNESS)बांधल्यानंतर पहिला प्रश्न विचारला "आधी कधी रॅपलिंग केलय का?" झालं.... भितीची झालर अजुनच गडद झाली...आणि उसनं अवसान आणुन तिला उत्तर दिल "नाही..." तीने एक कटाक्ष टाकला आणि तिच्या मनामध्ये सुद्धा भितीयुक्त भावना तयार झालेली जाणवली...खर काय तिच जाणो... श्रीराम आणि मी दोघेही जण एकमेकांना रोपबरोबर 8आकड्या सारख्या दिसण्याप्रमाणे बांधलेलो होतो....आम्हां दोघामध्ये माझी सॅक होती...श्रीराम चे हात आंणि पाय, त्याने अनुक्रमे माझ्या गळ्याभोवती आणि कमरेभोवती बांधलेले होते. मंदार आणि वर्षा दोघेजण मला सुचना देत होते...आणि सांगितलेल्या सुचनांच आज्ञाधारक बालका प्रमाणे पालन करत होतो ...मी उतरायला सुरुवात केली...सुरुवात अपेक्षेप्रमाणे अडखळतच झाली...श्रीरामच वजन,सॅकच वजन हे एका क्षणी पेलवणार नाही....वाटल सांगितलेल्या सुचनेनुसार मी उतरत राहीलो....रात्रीच्या अंधारात किती उतरलोय,किती शिल्लक आहे हे कळायला काही मार्ग नव्हता....आणि घोळ झाला श्रीरामने गळ्याशी आणि कमरेभोवती बांधलेले हात-पाय सोडले आणि त्याचा शरीराभोवती असणारा संपर्क तुटला...आता फक्त तो आणि मी एका दोराच्या आधारावर होतो....छातीवर दडपण आल...श्वास अडकायला लागला...त्याच वेळी श्रीराम ने बहुतेक मागे वळुन पाहिल आणि त्याला उंचीचा अंदाज न आल्याने तो घाबरला.....त्याच्या तोंडातुन शब्द बाहेर पडले "अरे देवा...अरे पांडुरंगा..विठ्ठला,आता माझ कस होणार" त्याच्या ह्या वाक्याने मी इतक्या वेळ आणलेल सगळं आवसान गळालं..मला उतरत असताना श्रीरामला खाली व्यवस्थित उतरवायच हे एकच लक्ष त्यावेळी डोक्यात घेऊन उतरत होतो...श्रीरामच्या त्या वाक्याने माझी सगळी ताकत संपली
माझा हात रोप वरुन सटकला आणि इतक्या वेळ कातळाला असलेले पाय सुद्धा सटकले....आणि मी,श्रीराम दोघेही जण एका रोप वर लटकुन राहायला लागलो....मी काटकोन स्थितीमध्ये ३६०°अंशात फिरायला सुरुवात झाली....माझ्या,श्रीराम आणि सॅकच्या वजनामुळे मला रोप पकडण शक्य होत नव्हतं..मी ह्या पुर्ण अवस्थे मध्ये २० ते ३० सेकंदात चिंब पावसाने भिजावं...इतका चिंब मी घामाने भिजलो...काही सुचत नव्हतं, रोप पकडाता येत नव्हती..पण ती पकडण गरजेचं होत...
श्रीराम घाबरलेला होता...त्याला समजवता येत नव्हतं ....अशाच अवस्थेत जोर लावुन रोप पकडली खाली उभ्या असलेल्या अजिंक्य आणि तेजस आवाज दिला...आवाज साधारण ५ ते ७ फुटांवरुन आला....मग हायस वाटलं कि आवाज जवळचा आहे म्हणजे अंतर सुद्धा कमी शिल्लक राहिले आहे...याची खात्री पटल्यानंतर खालच्यांनी रोप थेट सोडायला सांगितली...आणि मी जमिनीवर उतरलो ....उतरल्यानंतर मी ५ ते ६ मि.फक्त एकाच ठिकाणी बसुन होतो इतका त्या घटनेने माझ्या मनावर प्रभाव पाडला होता........

त्यानंतर मी खाली जाऊन बसलो...सावरलो नव्हतोच,तरी जाऊन बसलो ...रात्र तर केव्हाच झाली होती.माझ्या आधी उतरलेल्या लोकांनपैकी कस्तुरी,रविशा,रचना,रोहन,योगीराज,तेजस,सागर,जय,श्रीराम,ग्रेशा तिथे होते...आणि अश्विन,अमु,सचिन,मेधा,काका,सुशांत हि मंडळी पुढे गेली अस कळालं मात्र ह्यांचा पुढे जाण्याचा हेतु काही साध्य झाला नाही...काही वेळाने अश्विन,अमु,सचिन हे परत आले त्यांनी सांगितले कि पुढे जायला काही वाव नाही...मी अजुनही स्थिरावलो नव्हतोच..फक्त ऐकत होतो...माझ्या नंतर मंदार आणि वर्षा हे दोघेच शिल्लक राहिले....मग मंदार ने उतरायला सुरुवात केली...काही वेळाने तो खाली आला...त्याने माझ्या इतका वेळ नक्कीच नव्हता घेतला..गडद अंधार शेजारचा माणुस ओळखता येत नव्हता...फक्त आवाजाने ओळखता येत होत की ती व्यक्ती कोण आहे ते...अंधाराबरोबर थंडी सुद्धा वाढायला लागली....कोण काय करतयं ह्याचा पत्ता नव्हता...मध्येच कोणाची तरी टाॅर्च पेटायची...बंद व्हायची..बहुतेक सर्व स्वयंपाक बनविण्यासाठी आणि रात्र काढता येईल इतपत जागा शोधत होते..पण ती काही मिळत नव्हती....अजुन वर्षा उतरायची बाकी होती...आम्हांला पण झालेल्या श्रमाने भुक लागली होती....दुपारी सुध्दा जेवण झाल नव्हतंच .....सकाळी केलेल्या नाश्त्यावरच होते सर्वजण......पण ती उतरलेल्या शिवाय आणि जागा मिळाल्या शिवाय....स्वयंपाक बनणार नव्हता.. .हे सगळं सुरु असतांना माझ्या बरोबर असणारी मंडळी रविशा,रचना,योगीराज,अमोल,सागर,तेजस,ग्रेशा आणि श्रीराम यांना भुक लागली होती आणि श्रीरामने पुन्हा एकदा आपली सॅकरुपी तिजोरीतुन बिस्कीटस चा खजिना बाहेर काढला..त्याच्यावर आम्ही सर्वजण तुटून पडलो...आणि ते संपवलं,थोड्यावेळाने वर्षा खाली उतरायचे पर्याय शोधत होती ...कारण सर्वजण खाली उतरले होते...आता ती एकटीच शिल्लक राहिली होती...उतरायची,इतक्यावेळ मंदार रोप रीलिज करत होता..आणि आता तो सुद्धा खाली उतरला होता..अंधारात नेमका अंदाज येत नव्हता...की जागा कुठे आहे..म्हणायला खाली अजिंक्य,तेजस,मंदार होते उभे पण तीच्या डोक्यात बहुतेक वेगळीच योजना होती.....ह्या सगळ्यातुन पर्याय समोर आला..की उलट "U" च्या टेक्निकने खाली...तोपर्यंत माझ मन स्थिर झाल होत...पण रॅपलिंगशी माझा पहिलाच संबंध असल्याने सगळं डोक्यावरुन जात होतं..ह्या "U" टेक्निकचा कल्पना लक्षात आली होती...की एक रोप सोडावी...दुसरी रोप लावलेल्या बोल्ट(BOLT) मधुन काढुन तीच एक टोक खाली असलेल्या व्यक्तीला देऊन,दुसरं टोक ते हारनेस(HARNESS)ला बांधाव...ही हारनेस(HARNESS) वर असलेल्या व्यक्तीच्या कमरेभोवती असेल...आणि वरील व्यक्तीने उतरायला सुरुवात करावी....त्याचवेळी खाली असलेल्या व्यक्तीने ती रोप दुसरी बाजु सोडत जावी...अशी ही कल्पना..पण वर्षा ने मात्र दोन्ही रोप सोडुन दिल्या ....का तर तिला खाली असलेल्या व्यक्तींवर विश्वास नव्हता.. तिचा निर्णय अतिशयोक्तीचा वाटला...त्यावर खालून-वर ,वरुन खाली..असे बरेच संवाद झाले त्याची फलनिश्प्पती मात्र शुन्य ....नंतर तिला उतरायला काही जागाच मिळेना ..अंधारामुळे खोलीचा अंदाज नव्हता...अशा अवस्थेत तिला तु उतरुच नको अस मंदारने बजावले...ती वर एकटी,खाली मी,मंदार,अजिंक्य,तेजस,कस्तु आणि रोहन बाकिच्यांचा तपास नव्हता...होते पण त्या अंधारात कळत नव्हतं..वर्षाला नंतर झोपायला सांगितल ती गेली...दर अर्ध्या तासाने आवाज द्यायचा अस ठरलं...हळुहळू अजिंक्य झोपला..तेजस झोपला...मंदार,तेजस,अजिंक्य थोडे वरच्या बाजूला होते..त्यांच्या थोड खाली...मी,रोहन आणि कस्तुरी तिघे गप्पा मारत बसलो...मंदार दर अर्ध्या तासाने वर्षाला आवाज द्यायचा ..एक-दोनदा तिचा प्रतिसाद आला नंतर तोही यायचा बंद झाला..ती स्लिपिंग बॅग मध्ये झोपली होती हे नंतर कळालं..पहाटे ४-४.३० मला झोप अनावर व्हायला..लागली आणि मी झोपलो....
सगळा दप्तर आवरुन पुढच्या वाटेला लागायच होत...मंदारशी जेव्हा बोललो त्यावेळी मंद्याने सांगितल की वर्षाला "तसच परत मागे पाठवल ...बस पर्यंत जायला सांगितले"...आणि काल झालेला प्रसंग हा स्वाभाविकपणे चर्चेचा केंद्रबिंदू बनला होता...तिने अस का केल?तिला हा निर्णय घ्यावासा का वाटला...?प्रामाणिक पणे सांगायच झाल्यास मला तिचा हा निर्णय अजिबात पटला नव्हता...किंबहुना तो पटण्यासारखाच नव्हता...कारण एक तर ती आमच्या बरोबर नव्हती,ती एक सराईत व अनुभवी ट्रेकर होती..त्यामुळे कळत-नकळत आम्ही तिच्या वर विसंबून होतो. आणि तिच्या बद्दल अपेक्षा...या सगळ्या विचारमंथनाच्या प्रवासाबरोबर आमच्या पायाचा सुध्दा प्रवास चालु होता..आता लक्ष फक्त खालच्या सपाट पृष्ठभागापर्यंत लवकरात लवकर पोहचण्याच होत...तिच्या बरोबर आलेला अजिंक्य आता आमच्या बरोबर होता...त्याच्याशी बोलता बोलता कळाल कि तो वर्षा आणि टिममधील सेफ्टी टिमशी निगडीत होता...पण त्यालाही एक ग्रुप लीड करण्याचा त्याचा पहिला प्रसंग....तोहि अनपेक्षित पणे आलेला.त्यामुळे कदाचित त्याचाही गोंधळ उडालेला..कि काय कराव...हे सगळे विचार एकी चालु असताना...घळी मात्र आपला मुळचा हट्टीपणा सोडायला तयार नव्हती..४५-५० फुटांवरुन खाली उतरल्यानंतर वाटल 'होत चला झाल...संपल... आता थोड चालुन गेलं कि आलच...पण खरी हालत वाईट तर तिथुन पुढे सुरू झाली,साधारण ५-५.५० फुटांचे पाषाण.....मध्ये तर २०-२५ फुटांचे ३ कडे लागले...बर ऊडी मारुन अंतर कापाव तर उभ राहायला जागा नाही धड...नुसतं ह्या दगडावरुन त्या दगडावर.....साधारण रविवारी दुपारी २.००-२.४५ दरम्यान आम्ही त्या सपाट ,मोकळ्या जागेपाशी पोहचलो..जे आम्हाला काल संध्याकाळी पोहचायच होत ते आम्ही दुपारी अडीच वाजता पोहोचलो होतो...पण पोहोचलो ह्यातच समाधान होत...जागा साधारण २०-२५ जण राहु शकतील इतकीच...बाजुला पाण्याचा झरा वाहत होता...टेंट बांधता येतील...अशी जागा...बाजुला पाणी..त्यामुळे ती राहण्यास योग्य फक्त आवश्यक ती काळजी घेतली..किं झालं,आता थांबुन जमणार नव्हतं...म्हणुन पुढची वाट चालायला सुरवात केली. ...थोड्याच वेळात आम्ही नदी पात्रात आलो...या पात्रांतुनच चालत होतो..आणि आणखी एक bomb पडला..आम्ही वाट चुकलो.....वास्तविक ज्या ठिकाणांहून जायच होत ती वाट आम्ही मागे सोडली होती....आम्ही पुढे आहे पुढे आहे म्हणत...पुढे जात होतो. नंतर कळाल कि ती वाट आम्ही मागे सोडली..मग मात्र निराशा वाढायला लागली...एके ठिकाणी तर अजिंक्यने हद्दच पार केली...निराशेच्या भरात तो थेट आम्हांला म्हणाला..."कि लवकर चला..नाहीतर मी कोण लहान कोण मोठ पाहाणार नाही.." त्यावेळी सुशांतच्या रागाचा पारा चढला आणि थेट मंद्याला म्हणाला "ह्याला समजाव .....हा खुप बोलतोय" आणि चालायला लागला..खरेच होते राग येणं..कारण आमच्या बरोबर असणारे काका हे सर्वात वयाने मोठे आम्ही सर्व जण,मंदार मामा,नरेंद्र दादा,बाळा दादा ह्या सगळ्यांच त्यांच्या बद्दल आदर होता.आणि आहे..त्यांच्यां मान ठेवायचा नाही हे "आती" होतं..आम्ही सर्वच त्याच्यावर नाराज होतो... एक प्रसंग त्याच्या पार्टनर वर्षाने केला...दुसरा ह्याने. परत संध्याकाळ व्हायला लागली... मग ठरल कि सुशांत आणि तेजस पुढे जाऊन एखाद्या गावांतुन मदत..मिळेते का हे पाहाव..ठरल्याप्रमाणे ते दोघ गेले आणि चालत जायला लागलो..काही वेळाने पुढे गेल्यावर एका उंचवठयावरून माझ्या मोबाईलला नेटवर्क मिळाल,हेही मला कळाल ते मला आलेल्या एसएमएस टोनमुळे... तिथुन मग आम्ही वर्षाशी संपर्क साधुन तिला..परिस्थितीची कल्पना दिली....आणि परत पुढे चालायला लागलो...साधारण तासाभराने आम्हाला...एक ट्रॅक्टर दिसला..आणि आमच्या इतक्या वेळ मेंदू मध्ये,जीवामध्ये जी घालमेल चालु होती...ती एका क्षणात नाहिशी झाली..त्या दादांना आम्ही विनंती केल्यानंतर, आम्ही आमच्यातल्या काहिंना ट्राॅलीत बसवुन गावाकडे पाठवल... राहिलेले आम्ही चालत निघालो मात्र परिक्षा बहुतेक आम्ही उतीर्ण झालो नव्हतो....कारण वाटेत चालत असताना इतका तुफान पाऊस चालु झाला कि बस रे बस....सगळे जण झाडुन,मोजुन २ मिनीटांमध्ये चिंब भिजलो..आणि आम्हांला
थंडीने घेरले...तसच आम्ही गावात गेलो..गेल्यावर एक नंबरी कडक गरम चहा मिळाला तेव्हा बर वाटल..मग कपडे बदलून स्वयंपाक करायला घेतला..त्या गावातल्या लोकांनी आम्हांला करु दिला नाही..त्यांनीच तो केला ज्या गावात आम्ही पोहोचलो...ते "डेहेणे" होत..एका क्षणी आम्हाला विश्वास बसला नाही की आम्ही २२ किलोमीटर अंतर कापल होत....तोपर्यंत वर्षा बस घेऊन गावात आली...जेवण केल आणि गावातल्या लोकांचे आभार मानुन परत तळेगाव कडे निघालो बस आमची शहापुर-कल्याण मार्गे तळेगावला निघाली......नंतर मी झोपलो.. जाग आली तेव्हा तळेगाव आलेलं होत...तळेगाव पासुन सुरु झालेला प्रवास परत तळेगावी येऊन थांबला होता....पण जस पहिल्या सदरात लिहील होत...ह्या ट्रेक ने आम्हाला only ट्रेकर्स पासुन organising ट्रेकर्स बनवलं..कोण चुकल ह्याही पेक्षा काय आणि का चुकल हे जास्त महत्त्वाचे,काही मुद्दे मी नमुद करणार आहे....☆ कुठलाही ट्रेक करण्याआधी त्या जागेची संपुर्ण माहिती आपल्याला असावी.
☆ जो किल्ला किंवा ठिकाण आपण पाहणार आहोत ते आपल्यातल्या लोकांना माहीत असावा...म्हणजेच त्याचा पायलट (रेकी) ट्रेक करावा..
हे दोन मुद्दे मला प्रामुख्याने ह्या ट्रेक ने शिकवले..





Comments