आठवणीतला 'राजमाची'





ट्रेकवाटेवरच पहिल पाऊल......

MileStone पहिला 

"अरे केदार जायचंय नाही का तुला?" अशी आजीची हाक ऐकल्या बरोबर,थोड्या वेळा पुर्वी पतंग उडवण्यासाठी गेलेलो मी खाली आलो, तयारी केव्हाच झाली होती जायची, पण खेळण्याच्या ओघात, मी निघायचं विसरु नये आणि सोबत न्यायच्या वस्तू विसरु नये म्हणून ती हाक होती. 
मामाकडे सुट्टी घालवायला आलेलो मी! सुट्ट्याच होत्या!  म्हणुन मामा म्हणाला "आपण फिरायला जायचंय" आणि मी चमकलो!  लहान होतो त्यावेळीं कधीतरी एकदा मी शाळेच्या सहलीला गेलो होतो 'शिवनेरी' नावाच्या किल्ल्यावर...त्यानंतर ते मामा ने मला "आपण फिरायला जाणार आहोत" सांगेपर्यंत 'सहलीची' ठिकाणं, वेळ असे काही रुसले...कि पावसाची वाट पाहण्या-या चातकाला ढगांनी ठेंगा दाखवुन हिणवाव आणि तेत्या चातकाने ते हतबल होऊन पहात रहावं'....
       जाणार कुठे तर "राजमाची" नावाचा कुठलासा किल्ला होता लोणावळ्याजवळचा इतकीच माहिती मिळाली होती मला आणि माझ्यासोबत येणारे अजुन दोन सोबती माझी बहिण श्रुती व मंदार नावाचा नुकतीच ओळख झालेला मिञ , असे आम्ही तिघे जण आम्ही आमच्या पहिल्या वहिल्या "ट्रेकला" निघालो! पण मामा कुठे??? कारण आम्हांला सोडायला मंदारची आई येत होती....माझा मामा मागुन येणार होता असं आयत्या वेळी कळालेल.....सर्वांनी एकत्रीत जमविण्याच्या ठिकाणीं पोहोचलो, पाहिलं तर काही लहान-मोठी माणसे, दादा वैगरे असे सगळेच.....पण ओळखीचे चेहरे केवळ दोन जण मंदार आणि माझी बहिण हेच , हजेरी झाली आणि आम्ही घोरावाडी स्टेशनवर येऊन थांबलो..साधारण संध्याकाळची ५ ते ६ ची वेळ असेल..लोकल ट्रेन आली आणि प्रवास सुरू झाला ...आमच्या बोगीत 'जय भवानी-जय शिवाजी'चा नारा सुरू झाला घोषणेचा आवाज इतका '' होता संपुर्ण ट्रेन आवाजाने दणाणली....लोणावळा स्टेशनवर उतरलो तर आवाजाने स्टेशन परिसर सुद्धा दणाणला होता, परत हजेरीचा "टर्न" झाला....संख्या झाली १२०....आयो... एवढी! मग का नाही परिसर दणाणणार???? ..पण माझ्या डोक्यात वेगळाच विचार ...मामा कुऽऽऽऽठे????? १२० संख्या झाली तरी ह्याच्यात मामा नव्हतातच...आता मामा कुठे? हा प्रश्न पडणं स्वाभाविक होत...त्याला कारणही तसच....स्टेशनवर एका दादाने हजेरी झाल्यावर सांगितले कि किल्ला आज रात्रीच आपण चढणार आहोत.... ओळखीचें कुणी नाही....ही दोन जण तेही पहिल्यांदाच आलेले....वर ही बॅग...ह्या बॅगेत माझं आणि मामाच असे दोघांचे सामान... केवढी ही जालिम दुनिया??? बर ही सुपीक कल्पना सुद्धा माझ्या लाडक्या मामाचीच...आलिया भोगासी.....म्हणत पुढची वाट चालायची..मामा नव्हता आणि दिसला नाही म्हणुन मी निराश होतो....माझी अशी अवस्था होती तर श्रुत्याच काय...तीला हा प्रश्न  पडला होता का?? आणि मंदार! त्याला सुद्धा मामाच नसणं खटकल असेल तर???? त्याच उत्तर आज तरी हि मंडळी कदाचित देणार नाहीत...कारण माझ्या पहिल्या वहिल्या सहल किंवा ट्रेक बद्दल मीच बऱ्याच वर्षांनी लिहितोय...काही बाबी,प्रसंग, आठवणी नाही म्हणाल्यातरी आठवणार नाहीत किंवा त्या विस्मृतीत गेल्या असतील...तर त्यांच्या कडुन ही अपेक्षा करणं चुकिचेच......न राहवून मी दादाला विचारलच " मंदार मामा कुठे आहे?"...त्याने निर्विकारपणे उत्तर दिलं...तो रस्त्यात भेटेल ...आता आणि कुठला???? ...चालत चालत रस्ता(डांबरी) तर संपला ...."senerity resort"(हे नाव आताच आहे land mark म्हणुन गृहीत धरावं) ला लागुन असलेल्या वाटेने चालायला सुरुवात केली...अर्ध्या-पाऊण तासाने...समोर एक मोठी दगडी भिंत बांधलेली दिसली ...आणि वाटलं...चला किल्ला चढायला सुरूवात केली... काही वेळानंतर घामाने शरीर चिंब भिजले आणि अंगावरच्या शर्टने माझ्या बॅगेत जमेल तितका विसावा घेतलेला होता......त्याच भिंतीला उजव्या बाजूस वळसा मारुन गेल्यावर एक पाण्याचा साठा नजरेस पडला आणि हाच तो तुंगार्ली डॅम!.....

MileStone दुसरा....

तुंगार्ली डॅम वर आम्हांला थांबण्यास सांगितले गेले...डॅम तसा छोटाच पण..आजुबाजुच्या गावातील लोकांनसाठी...किमान वर्षभर पुरवठा करेल इतका पाणीसाठा, मी पाण्यात अगदी हात-पाय दोन्ही बुडविले...ही कृती इतकी सहजतेने केली....पण त्याच क्षणी त्याची प्रतिक्रिया सुद्धा आली "ए केदार...पाण्यात हात-पाय बुडवु नकोस..... मागे..हो" कोण बोललं हे वळून पाहिलं तर एक दादा...मला हातवारे करत म्हणत होता..."पाण्यात  हात-पाय धुवायचे नाहीत" माझा प्रश्न..."का????" त्यानंतर त्याने सांगितले "पाणी बाहेर काढा आणि मग हात-पाय धुवा"(ही मला मिळालेली पहिली शिकवण..) ह्याच्या पाठीमागचे कारण, कि हे पाणी आस-पासच्या गावातील लोक पिण्यासाठी वापरतात...तेच पाणी आपण गढुळ किंवा खराब करायच का???? निश्चितपणे ह्याच उत्तर "नाही" हेच येईल .... बाकी हे कारण मात्र १०० नंबरी खरचं.......
           त्यानंतर आम्हांला तिथेच सोबत आणलेला जेवणाचा डबा खावयास सांगितले आणि मी डबा उघडला तिखट-मीठाची पोळी,चटणी आणि एका मोठ्या डब्यात दही-भात असं....मी,मंदार आणि श्रुत्याने जेवायला सुरवात केली, साधारण कोरडचे पदार्थ दिले होते तेच मंदारच्या आईने पण दिलेल.....आम्ही तिघांनी आमची जेवणं संपवली....बाकी लोकांची होई पर्यंत आम्ही तेथेच थांबणार होतो...मंदार उठुन गेला काठी का काहितरी शोधण्यासाठी मी,श्रुती तिथेच बसुन होतो...पण काही वेळातच मला मंदारचा आवाज आला तो मला बोलवत् होता मला...उठुन त्याजवळ गेलो..तर त्याने मला  साधारण मोठ्या आकाराचा जाणारा प्राणी दाखवला...तांबुस रंगाचा.....हाच मी पाहिलेला पहिला साप.....पण हे मला माहित नव्हतंच कि "तो साप आहे" कदाचित मंदारला सुद्धा माहित नव्हतं,तो आणि मी असे दोघेही त्याच्याशी काठीने खेळायला लागलो ...त्याला उचलायचो, कि तो परत खाली पडायचा आणि पळायला लागायचा... अस एक-दोन वेळेला झाल्यावर...आम्ही तो प्रयत्न सोडला...आणि तो साप सरपटत जायला लागला...त्याच्याबद्दल माहिती करुन घ्यावी ह्या उत्सुकते पोटी...मी अमित दा ला विचारल "हे काय आहे?" त्याने त्याला पाहिलं आणि  हा "मण्यार" नावाचा साप आहे...'ठिक आहे'...मला त्याच्या बद्दल माहिती नव्हती..पण आता नाव कळालं...पण पुढे दादाने दिलेल्या माहिती ने माझ्या "शिट्या वाजल्या" ह्या "मण्यार" नावाच तांबुस रंगाच,गोंडस अंगाच बेन विषारी होत...त्याच्या विषाच्या जहालत्वाची "मोजणी" ही त्याला सापाच्या विश्वात आणि पर्यायाने  आपल्या ही....दुस-या क्रमांकावर नेऊन ठेवते...आणि आम्ही दोघे जण मघापासुन त्याचाशी खेळत होतो...वाव रे ! बाजीराव
आता स्वतःच्या बहादुरीचे कौतुक करायचं..कि...मुर्खापणाचा "सोहळा"...हा प्रश्न कदाचित दादाला पण पडला असेल....असोत ह्या ट्रेकमध्ये मात्र मला एक "वेडा" "वेगळा" म्हणावा असा मित्र नक्कीच मिळाला जो आजही माझ्या सोबत आहे, तो माझ्या ट्रेकवाटेवरचा सहकारी....जवळचा मित्र......मंदार भावे!...
     स्वतःच्या केलेल्या "उद्योगाचा" पश्र्चाताप करत असताना....दादा ने निघण्याची सुचना.... केली आणि आम्ही आमची "पोतडी" उचलुन चालायला लागलो....मी व मंदार सुरूवातपासुनच राहुल दा सोबत पुढे चालत होतो ...आणि श्रुती इतर मुलींबरोबर चालत होती....हा केलेला प्रताप मामाला नक्कीच कळु द्यायचा नाही ही "शेंडीला" गाठच मारुन ठेवली... आज जेव्हा हा लेख वाचेल तेव्हा मामाला हे कळलेच.... पण हरकत नाही.... पुला खालुन बरच पाणी गेलय आता...वाटेत चालत असताना एक छोटी वाडी लागली जी "नांदगाव" या नावाने ओळखली जाते...त्याच्या पुढे येई तोपर्यंत चांगलाच अंधार दाटुन आला होता.....आणि हि वाडी संपली पण वाडीच्या शेवटच्या टप्प्यात एका भिंतीवर दोन माणसं बसलेली दिसली.. क्षणार्धात मी ओळखल...मामा!

 MileStone तीसरा....

मामाला पाहिल्यावर....मी झटकन त्याच्या मिठीत विसावलो..आणि मामानेही पटकन मला जवळ घेतलं....ही कृती इतकी क्षणार्धात झाली की कॅमेरा शटर स्पीडशी जर कोणी स्पर्धा करण्यास सांगितले असते तरीही मीच जिंकलो असतो....खरतर मी निःश्वास सोडला..होता मामाच्या दिसण्याणे मला हायस वाटलं होत कारण मामा असेल कुठलीही मस्ती करायला मला रान मोकळ असायचं ९-१० वर्षाच्या पोराला जी मस्ती अपेक्षित असते ती सर्व मी करायचो...म्हणुनच मामा नव्हता तेव्हा बुजत बुजत चालणारा मी आता ऊनाडक्या करणारा "केदार" झालो....पण आतातायीपणा मी केलाच होता..."मण्यार"शी खेळण्याचा..तो फक्त मामाला कळु नये हीच इच्छा होती ...सुदैवाने श्रुत्या दोन्ही वेळेस माझ्या बरोबर नव्हती...त्यामुळे तिला कळण्याचा आणि त्यानंतर तिने.."चाहाड्या" करण्याच्या विषयाला पुर्ण विराम मिळाला होता...full stop!
    मामाला मी म्हणालो "ही बॅग घेना? खुप जड आहे" इथे माझ्या ह्या लाडक्या मामाने चक्क नकार दिला...अरे! हि काय गोष्ट झाली येवढ्या लहान मुलावर हा अन्याय होता....इतका राग आला कि ...माझ्या लाडक्या मामाचा मी ..."हिरण्यकक्षपु" च्या अवतारात प्रकट केला ...पण तो "हिरण्यकेक्षपु" झाला पण मी कुठे कृष्ण होतो??? त्याला आवाहन करायला..
   आलिया भोगासी......म्हणत मी चालायला लागलो..तर by 1get 1 free स्किम मला मिळाली, "तु माझ्या बरोबर चालायच नाहिस...तु सगळ्यांन बरोबर आलायस... आता त्यांच्या बरोबरच चालायच..." "अरे अब क्या बच्चे कि जान लोगे???" बर बॅग नाही घेतली ठिक.....आहे चालायच पण नाही...हे जरा अतिच होतं...पण पर्याय नव्हता....चालावच लागणार होत...हा ऐकणार नाही माहिती होत...श्रुती कुठे आहे?? "मागे मुलिंबरोबर येतेय"....मी नाराजीत उत्तर दिल.
     चालत असताना मला पुढे सोडुन हा मागे केव्हा गेला हे कळालच नाही,मी ,मंदार आणि बाकिचे चालत होतो...रात्रीच्या गडद अंधार..कुठे चाललोय कळत नव्हतं...परत बसायचो,थांबायचो...दादाने कातळदरीशी सगळ्यांना बसवलं..आम्ही त्याठिकाणी बराच वेळ बसलो पावसाळ्यात त्या वाटेवर प्रचंड प्रमाणात पाणी वाहात असते..हे तेव्हाच मला कळालं.....
मध्येच एका वाटेवर दादाला वाटल चुकलो आपण...मग परत भिती वाटायला लागली.."आपण चुकलो" ह्या शब्दानेच माझी गाळण उडायला लागली होती...परत मामाची आठवण...
काही वेळाने आम्ही परत आमच्या जायच्या वाटेला आलो...मामाही माझ्या बरोबरच होता....कदाचित त्याला देखील माझ्या मनातली भिती कळाली असावी...त्यांनी माझ्या जवळुन बॅग घेतली....तु माझ्या बरोबर राहिलास तर माझ्या बरोबरच -हाशील...तु सगळ्यांशी मैत्री करायला हवीस म्हणुन तु त्यांच्या बरोबर राहिला हवय...
त्याच हे समजावणे...मी "मोठ्यांच ऐकायच असत"ह्या संस्कार categoryतल वाक्य म्हणुन ऐकुन ठेवलं....
९-१० वर्षाच्या पोराला ना समजण्याच वय होत...ना ती बुद्धी..पण आज ज्यावेळी मागे वळून पाहतो किंवा "राजमाची"च्या ट्रेकपासुन ते "माझी ट्रेकवाट" हे सदर लिहिण्यापर्यंतचा किंवा "एक organiser" बनण्यापर्यंतचा प्रवास...हा संपुर्ण "तु माझ्याबरोबर राहु नकोस,तु त्यांच्या बरोबर आलास,मग त्यांच्या बरोबरच रहा" ह्याचच फलितयश म्हणायला हवं,
 "पोहे तयार करून ठेव....रे...आलोच" ह्या वाक्याला मिळालेला प्रतिसाद आणि उंचावरून आलेल्या टाॅर्चच्या उजेडाने...माझी खात्री झाली कि आपण किल्ल्याच्या जवळ पोहचलो....बऱ्याच वेळाने आम्ही चाळ वजा घरांपाशी पोहचलो आणि तिथे दादाने बसायला सांगितलं ती जागा होती उधेवाडी गावातली शाळा!

Milestone चौथा

सकाळी जाग आली तेच कुत्र्याने माझ्या अंगावर मारलेल्या
उडीने...अस कुठं असत रावऽऽऽ ? पुर्ण झोप सुद्धा नव्हती झाली, आजुबाजुला  पाहिल तर जवळपास सर्वजण उठलेलेेे होते आणि गप्पा मारत होते...आंथरुणात बसुनच,तेव्हाच सगळ्यांचे चेहेरे दिसायला  लागले व्यवस्थित... मामा कुठेतरी होता फिरत,तो मला काही उठावयाच्या  फंदात पडला नव्हता....चांगलच होत....आणि हे सगळं मी अंथरुणात बसुनच पाहात होतो....कारण मलाही अंथरुणातुन उठायची इच्छा नव्हती....हे सगळं सुरु असताना...एक अतरंगी कार्ट आल तिथे...."मंदार खोल्लम" हा तिसरा मंदार ....एक माझा मामा मंदार ,दुसरा माझ्या बरोबर आलेला मंदार आणि हा तिसरा मंदार...आणि हा सुद्धा दोघांन सारखाच "अतरंगी","वाढीव".....वास्तविक हा दादा माझ्या मामाचा मित्र...सगळेच वाढीव नुसते..एक पेक्षा एक म्हणावे असे...तर मंदार खोल्लम हे पात्र त्यातलच एक...ह्याच्या मध्ये समोरच्याला शब्दांच्या बुडबुड्यातुन खिळवुन ठेवण्याची जबरदस्त ताकत..हौशी..हा जेव्हा आला त्याने सांगितले की काल रात्री "बिबट्या"आला होता....इथे येऊन गेला...अपेक्षेप्रमाणे मी लहान असल्याने ...विश्वास ठेवण साहजिकच आल..पण ते खर-खोट तोच जाणो...बिबट्या कसा आला आणि कसा गेला..इथपर्यंत त्याने वर्णनंपर कथा सांगितली.....मग मात्र आज्ञा झाली ...आणि आमच्या बॅग्ज घेऊन ...निघालो जाताना वाटेत काही गोष्टी कळाल्या.

              सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणार्‍या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर ‘उल्हास नदीचे खोरे’ म्हणून ओळखला जातो. याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते. याच ‘उल्हास नदीच्या खोर्‍याच्या प्रदेशात लोणावळ्याच्या वायव्येस साधारण १५ किमी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. कल्याण ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती. या बंदरापासून बोरघाट हा पुण्याकडे जाणारा हा पुरातन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणार्‍या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख किल्ला म्हणजे राजमाची. किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर किल्ले, तर दुसर्‍या बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असावं असा अंदाज आहे....अशी माहिती दादा लोकांकडुन कळाली....तोपर्यंत मी एका हातात शुज आणि खांद्यावर बॅग घेऊन चालत होतो.. वाटेत आंब्याची झाडे...दिसत होती अमराई होती बहुतेक....थोड्या अंतराने..मला एक मंदिर दिसल जुनाट ...दगडाच! ....त्याच्या सभा मंडप ..दगडी खांबाचा होता....गाभा-यात शंकराची पिंड होती.....आणि आम्ही तिथेच बसलो बॅग टाकुन....हे नुकतेच मंदिर बाजुने खोदल्यासारखे वाटत होते....माती  तशीच होती....मंदिराच्या समोरच्या बाजुला एक गोमुख असलेला हौद होता....आपल्या हिंदू संस्कृती...प्रत्येक....शंकराच्या मंदिरा असते तसेच  ते याही मंदिरात होते...ते गोमुख..त्यातुन पाणी त्या हौदात पडत होते.....कुठुन येत होते??...हा मला न झेपणारा विषय होता...मी २०-२१व्या शतकातील so called "विज्ञानपर्वाचा प्रतिनिधी"...म्हणुन जमिनीतील झिरपलेल.....पाणी असेल हा अंदाज बांधुन...विषयाची आणि विचारांचा समाप्ती कार्यक्रम घडवला......बाकि मंदिराचे रुपडं मात्र निश्चित मनात घर करणारे होते.......त्याच्या समोर मोकळ मैदान मैदानातील दिपस्तंभ....सगळच..सुरेख....सगळे स्थिरावल्या वर ...दादाने आम्हाला जेवण आणि आराम करावयास..सांगितला....
आणि आम्ही आंधळी-कोशीबिंरीचा खेळ खेळायला सुरुवात  केली...खरतर आराम करायला सांगितला होता...पण आम्ही तो मानता खेळायला सुरुवात केली होती......दु.४.३० सुमारास आम्ही सर्वजण राजमाची किल्ल्यावरील पहिल्या बालेकिल्ल्यावर जाण्यास निघालो...वाटेत चढत असताना एक मंदिर होत पत्र्याच..हेच ते भैरवनाथाचे मंदिर....मंदिर तस साधच...पण रेखीव, समोरच्या बाजुला दिपस्तंभ..त्या सौंदर्यात भर घालत होते...ह्या मंदिराच्या समोरुनच श्रीवर्धनगडावर जायला मार्ग होता....

श्रीवर्धन:- 
राजमाचीच्या असणार्‍या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज बर्‍यापैकी सुस्थितीत दिसत होती . किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून वाटते. दरवाजाच्याच बाजुला पहारेकर्‍यांच्या देवड्या किंवा खाच असलेल्या जागा होत्या .....इथे मात्र एका चैतन्य नावाच्या मुलाने....

"गोब्राम्हण प्रतिपालक प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधिश्वर राजाधिराज 
श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय"
हि घोषणा दिली हि घोषणा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकली पण आज सुद्धा माझ्या जशीच्या तशी ठळक पणे आठवते किंवा मी ती कधी विसरुच शकणार नाही...
 किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे. समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोट्याचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो.
ह्या सगळ्या माहित्या मला दादांकडुन कळत होत्या...अर्थात आज सुद्धा विस्तृत लिहिण्यासाठी मी...दादांची,मामाची मदत घेतोच आहे.......हे सर्व पाहून झाल्यावर..आम्ही परतीच्या वाटेला लागलो.....



Comments

Popular posts from this blog

सांधण व्हॅली... प्रथम चरण

रौद्र की रुद्र (कोकणकडा सफर)