सांधण व्हॅली 2.0


 हो नाही ,हो नाही म्हणता  सांधण व्हॅली चा ट्रेक ठरला, शंकाकुशंकानी प्रभावित झालेला हा ट्रेक खऱ्या अर्थाने होतो की नाही ? ह्या टप्यावर येऊन पोहोचला होता...त्याला कारणही तशीच अगदी! पावसामुळे रद्द होणारी लोकं त्यातुन निर्माण झालेलं गोंधळाचे वातावरण, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किती लोक येणार ह्याच मुद्यावर अडकलेली 'गाडी'अखेर 11च्या सुमारास 19 लोकांच्या साथीने 'साम्रद' गावाच्या दिशेने धावायला लागली,मग नारायणगाव येथील  चहा,दूध असा ठरलेला शिरस्ता ....पण वाटेत पहाटे 5 पर्यंत पडत असलेला पाऊस,पावसाच्या पडणाऱ्या थेंबांबरोबर मनात सुद्धा भीतीचा चालणारा पाठशिवणीचा खेळ.... हे सगळंच परिस्थितीच्या विरुद्ध होतं... पण 'इरादे हे फौलादी ,हिम्मते हर कदम' ह्या अविर्भावात असलेली आम्ही मंडळी ह्या टप्यावर सुद्धा न खचता जायचंच ! ह्याच निकराने निघालो होतो, आणि 6 च्या सुमारास.. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात प्रवेश करताच सुुर्यानारायणाने आपल्या किरणांच्या रूपाने आम्हाला आमंत्रणच दिलेे मग मात्र आत्मविश्वासाने जी काही 'हनुमान उडी मारली' की हा ट्रेक आपला पुर्ण होणार ह्याची खात्री वाटायला लागली....गावात पोहचल्यावर ज्ञानेश्वर ने नाष्टा करते वेळी रॅपलिंग करता येईल म्हणून सांगितले....क्या बात! आणि अशी तशी नव्हें तर तीही 120 फुटाची पहिल्या ट्रेकला आम्ही 55 फुट रॅपेल केलं होतं आता 120 फुट! वाह......ठरलेल्या जागी ज्ञानेश्वर आम्हाला घेऊन आला आणि त्याने झाडाला रोप बांधला आणि the game begins...
एक एक जण उतरायला सुरुवात झाली...मी मात्र मागेच थांबलो सगळ्यांना उतरवण्यासाठी, पण हे सगळं चालू असताना मी मात्र सगळ्यांच निरीक्षणही करत होतो माझी ही सवय वाईट म्हणावी की चांगली ह्या फंदात आजपर्यंत मी पडलेलो नाही सगळ्यांचेच हावभाव मी लक्षपूर्वक बघत होतो जे नवीन होते त्यांच्या चेहऱ्यावर भीती,उत्सुकता यांचा रंगमिसळणीचा प्रकार चालू होता खाली उतरल्यानंतर खालून येणारे 'आवाज' आयुष्यात विजयी झाल्याच समाधान व्यक्त करत होता त्याच बरोबर ही सगळी मंडळी वरून उतरण्याऱ्या लोकांना मार्गदर्शन सुद्धा करत होती हे खरंतर मला वर बसून हसवत होते कारण मघा शी उतरताना हीच मंडळी घाबरत असल्याचं मी पाहिलं होतं आणि आता....असो ह्याचा आनंद मात्र मी मनमुराद घेत होतो...(http://mazitrekkvat.blogspot.com/2016/11/blog-post.html)
सांधण व्हॅली च्या भौगोलिक माहितीविषयी माझ्या आधीच्या ब्लॉग वर सविस्तर पणे लिहिलेले आहे त्याची ही लिंक सुद्धा दिलेली आहे.
आणि मीही खाली उतरलो नंतर मग संपूर्ण व्हॅली फिरायला आम्ही सगळेच पुढे गेलो आधीच्या सांधण व्हॅली ट्रेक मध्ये आणि आताच्या ट्रेक मध्ये 3 गोष्टी मात्र कॉमन होत्या मी,व्हॅली आणि पावसाच पाणी. व्हॅली पूर्ण फिरून येईपर्यंत पावसाने हजेरी लावली नाही....कदाचित तो सुद्धा माझ्यासारखाच , आम्हा आनंदी पामराच निरीक्षण करण्यात पडायचा विसरून गेला असावा ...कारण व्हॅली चा ट्रेक पूर्ण झाल्याबरोबर त्याने पडायला सुरुवात केली आणि आम्ही पळायला...
रात्रीच जेवण कमाल! गप्पा धमाल! आणि दुग्धशर्करा योग ....ज्ञानेश्वर ने आमच्या झोपायची सोय टेंट मध्ये केली. त्यात मिठाचा खडा मी टाकला सगळ्यांना लवकर झोपायला सांगितलं...कारण सकाळी उठून सिन्नरसाठी निघायचं होत...झोपल्यावर मात्र रात्री मला जाग आली कारण मुलींच्या ग्रुप मधुन एक मुलगी झोपेत बडबड करत होती.मी मात्र त्याच्याही आनंद घेत होतो. असले आसुरी आंनद घ्यायला मला मात्र भारी मज्जा येते...
सकाळी जाग आली तीच कोंबड्याच्या आरवण्या ने ....निसर्गानेच हा अलार्म सेट केलाय माझी काय बिशाद त्याला बंद करण्याची,मग मी सगळ्यांनाच उठवायला सुरुवात केली...

नाश्ता केल्यावर सगळ्यांनाच निघायला सांगितलं पण! नेहमी प्रमाणे लोक फोटो काढायला गेली होती आता ह्या लोकांना गोळा करायचं म्हणजे तुटलेल्या माळेतले मणी गोळा करण्याइतपत tough task... पण मीही जास्त लोड घेतला नाही कारण ह्यावेळचे मणी मॅग्नेटिक होते... जराशा प्रयत्नाने सगळे माळेत आले परत... आणि बस! आम्ही निघालो सिन्नरला....गोंदेश्वर च प्राचीन मंदिर पाहण्यासाठी.

(साभार विकिपीडिया)

गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे.[१]

हे मंदिर पुरातन भूमिज स्थापत्यशैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वतीगणपतीसूर्य आणि विष्णू यांची आहेत. 

मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.

रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.


 सिन्नरला भन्नाट झालेलं गोंदेश्वराच दर्शन हे नशीब म्हणायचं की प्रामाणिकपणे व्यक्त केलेली इच्छा पण 'झालं' हे महत्वाचे,बस ही परत तळेगाव दाभाडे ला यायला लागली वाटेत आम्ही पूर्वनियोजना नुसार श्री हरी पांडुरंग मध्ये जेवण करणार होतो. आणि ते व्यवस्थित झालंही नव्हे तर ते उत्तम झालं फक्त एक गोष्ट माझ्या कडून चुकली ती म्हणजे मी बांधलेल्या अंदाजापेक्षा हॉटेल च बिल जास्त झालं खरंतर निर्णय घेणे फारसं अवघड नव्हतं पण माझाच 'अभ्यास' बहुतेक कमी पडला किंवा हॉटेल मालकांवर जास्त विसंबुन राहिलो असही म्हणायला हरकत नाही...कारण काहीही असलं तरी त्याचा परिणाम एकूणच ग्रुपच्या निधींसंकलन वर पडला ...फरक फक्त इतकाच आहे ट्रेक यशस्वी पूर्ण झाला किंबहुना अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं झाला म्हणूनही असेल कदाचित ही बाब लक्षात आली नाही किंवा दुर्लक्षित केली गेली पण त्याची सल मात्र नक्कीच आहे. 
                                     समाप्त

Comments

सुरेख.. शब्दांतुन सृष्टी साकारावी तसे …👍

Popular posts from this blog

सांधण व्हॅली... प्रथम चरण

आठवणीतला 'राजमाची'

रौद्र की रुद्र (कोकणकडा सफर)