ट्रेकर्स 'लॉक'..... ट्रेकिंग 'डाउन'
ट्रेकर्स 'लॉक'..... ट्रेकिंग 'डाउन'
दिवाळी ट्रेक उत्तम पार पडला आणि नवे ट्रेक्स डोक्यात आकार घ्यायला लागले राजगड-तोरणा,अलंग मदन कुलंग..... मग कोल्हापूर जिल्हा की सोलापूर जिल्हा की सातारा हेच विषय डोक्यात चालू असताना,ह्या सगळ्यात नशिबाने आम्हा सगळयापुढे एक आव्हान उभं केलं आणि ते आव्हानं म्हणजे "कोरोना व्हायरस" ह्या एका संकटाने सगळ्यांना घरात बसवलं पण नुसतंच बसवलंच नाहीतर ज्या लोकांनी प्लॅन केले होते ते एका झटक्यात मातीमोल झाले साहजिकच आमच्या सारखे सतत भटकंती चा विचार करणारी 'भटकी जमात' सुद्धा सापडली आणि अजूनही आहे ह्याच वाईट वाटणं स्वाभाविक होत कारण गेल्या १०-१२ वर्षात ह्यात खंड पडला नव्हता किंवा गोनीदांच्या भाषेत सांगायच झाल्यास विक्रम-वेताळच्या दिनचर्येत खंड पडला नव्हता आणि अश्या परिस्थितीला सामोरं पुर्णपणे अनपेक्षित होत....
असो पण एक नागरिक, ट्रेकर ,भटकती आत्मा म्हणू हवं तर किंवा निसर्गाच्या सानिध्यात वावरणारी माणसं.....ह्या लॉकडाउन मध्ये फिरण्यावर बंधन आली आहेत किल्ले,ऐतिहासिक स्थळे बंद आहेत आणि नुसत्या गुगल अर्थ वर ठिकाणं बघणं ही स्वभावात नाहीए ,जुन्या केलेल्या ट्रेकच्या आठवणींची पारायणं होऊ घातलीय आणि व्हीडिओ कॉल्स च्या माध्यमातून आठवणींचा ठेवा हा चंदनासारखा उगाळून जातोय पण मग ह्या सगळ्यात आमची जवाबदारी म्हणुन काय ? हा प्रश्न ज्यावेळी मनात आला त्याचवेळी त्याच उत्तर सुद्धा मिळालं "आम्ही ट्रेकर आहोत" संयमी असणं,एकत्र राहणं हे आम्हाला सांधण व्हॅली च्या ट्रेक ने शिकवलं,प्रतिकूल परिस्थितीत सुद्धां सकारात्मक असणं हे साल्हेर-सालोटा च्या ट्रेक ने शिकवलं,आपल्यातीलच एकदा सहकारी जर आजारी पडला किंवा त्याला मदत हवी असल्यास ती वाटणारी 'काळजी', माणूस म्हणून वाटणारी 'आत्मीयता' ही रतनगडाच्या ट्रेकमध्ये अनुभवली,परिस्थिती अनुकूल असेल तर त्याचा मनमुराद आनंद कसा घ्यावा हे हरिहर-ब्रह्मगिरी,हरिश्चंद्राच्या सफरी ने शिकवलं, इच्छा असतानाही ट्रेकला जायला न मिळाल्यावर मनाची होणारी घालमेल ती तडफड आम्हाला मधु-मकरंदाच्या ट्रेक ने जाणीव करून दिली एकूणच आत्ता ज्या भावना आपण अनुभवतोय मग ती जाण्यासाठीची तडफड असो किंवा "हेही एक दिवस संपेल" ची संयमी आणि सकारात्मक भूमिका ह्या सगळ्या भावना आधीच आम्हाला आत्मसात आहेत त्या जाणिवा आम्हाला ह्या ट्रेक्सने दिल्यात आणि म्हणून आम्ही "आम्ही ट्रेकर्स आहोत" कारण आमचा इतिहास हार मानण्याचा नाही येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकत ह्याच सह्याद्रीच्या कुशीत मिळवली. लॉकडाऊन तर महाराजांनी सिद्धी च्या वेढ्यात सुद्धा अनुभवला आम्ही तर मावळे आहोत.....अजूनही आम्हाला काही दिवस......महिने ...ट्रेकला जाता येणार नाहीए ह्याच दुःख आहेच पण ती जवाबदारी सुद्धा आहे स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना ,मित्र-मैत्रिणींना सुरक्षित ठेवण्याची.
निसर्ग नव्याने रिकव्हर होतोय,प्रदूषण कमी होत चाललय , सह्याद्रीने सुद्धा बऱ्याच दिवसांनी माणसांच्या गर्दी पासून मोकळा श्वास घेतलाय हेही खरंच! पण त्यालाही आम्हा सगळ्यांची उणीव जाणवेल तो नव्याने स्वागताला सज्ज होईल आणि मग आम्हाला निसर्गाचं आणि पर्यायाने ह्या सजलेल्या राकट सह्याद्रीच आणि किल्यांचं रुपडं पाहायला मिळेल तूर्तास आपण सर्वजण आपली जवाबदारी ओळखुयात आणि घरातच राहूया,सुरक्षित राहूया आणि नव्या पाऊलखुणा तयार करण्यासाठी सज्ज राहुयात ....
हेही दिवस जातील ह्याच उमेदीवर .....
मनी उभरतो,
उरी फडकतो ,
शक्तिस्थळ अपुला
सह्याद्री !
कणखर ,रौद्र
भीषण रुप त्याचे
गौरवशाली सह्याद्री!
माझी ट्रेकवाट
ट्रेकर्स च्या मनापासून मनापर्यंत केलेलं गिर्यारोहण...
Comments