आनंदाची 'शिखर' चढाई (कळसूबाई मोहीम)

कळसूबाई शिखर बद्दल ..... कायमच एक अप्रूप राहिलेलं आहे....मग ते सोशल मीडिया वर प्रसिद्ध झालेले फोटो असतील म्हणूनही असेल किंवा मग महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर ...म्हणून नाहीतर मग त्याला महाराष्ट्राचं माऊंट एव्हरेस्ट म्हणतात म्हणूनही असेल कदाचित , आहे हे...नक्की .
गेल्या १६-१७ वर्षाच्या प्रवासात अनेक वाटा पायाखालून गेल्या चांगले बरे वाईट घटनांचे 'पुल' ओलांडले गेले पण कळसूबाई शिखर मात्र कायमच माझ्या पासून ४ पावलं दूर राहिलेलं आणि गेल्या २ वर्षा मध्ये तर निसर्गानेही स्वतःला रिसेट केलं....आणि आम्ही ट्रेकर्स ने सुद्धा स्वतःला...
"लॉक" असलेले ट्रेकर्स  नव्याने तयारीला लागली....आणि आम्ही पण ! गेली २ वर्ष शांत असलेला "Team Management" चा कट्टा "Whatsapp!" म्हणत... मेसेजेस ने सुरू झाला....किल्ला कोणता?  कुठला? हा ..नको....तो किल्ला करू....पासून सुरू झालेल्या चर्चेच्या बैठका ह्या 'कळसूबाई शिखर' नावावर थांबल्या.... माझ्या मनात मात्र ह्या वेळी वेगळच द्वंद सुरू होत...मला कसलीच जबाबदारी नको होती...माझ्या एकंदरीत कामाचा अनुभव...आजवर 'किल्ला पाहण्यापेक्षा'  बाकीच्या कामात खर्च झालेला वेळ ...ह्यात किल्ला व्यवस्थित न पाहता आल्याची सल...ही होतीच पण २ वर्षात पडलेला खंड , ह्याच २ वर्षात इतर 'कामांपेक्षा' स्वतःवर आणि वैयक्तिक आयुष्यावर केंद्रित झालेलं लक्ष ह्या सगळ्याच्या बरोबर मला खुणावत असलेली आपल्या देशातली इतर गोकर्ण,लडाख सारखी सुंदरतेने नटलेली ऐतिहासिक, नैसर्गिक ठिकाण ह्या सगळ्याचा एकत्रित परिणामांचा सार...म्हणजे माझ्या मनात चाललेलं द्वंद! प्रामाणिक पणे सांगायचं झाल्यास मला जर कोणी "हे काम आवडत का?" ह्या प्रश्नाच एका शब्दात उत्तर विचारलं,मी ते "हो" असेच देईन.....एकी कडे मनात हा संघर्ष सुरू असताना...मी सवयी प्रमाणे... कळसुबाई शिखर मधील हॉटेल,जाताना-येताना सगळ्यांसाठी द्यावे लागणारे जेवण , बसची व्यवस्था ह्या सगळ्याचे अंदाज घ्यायला आणि त्या अनुषंगाने माझ्या 'प्लॅन' ला आकार द्यायला सुरुवात केली. अर्थातच मी प्लॅन बनवून जमणार नव्हतच......त्यासाठी माझ्या इतर मित्रांची समंतीही आवश्यक होतीच...नव्हे तर ती गरजेची होती, आणि आहे.

शिखराबद्दलची गोळा झालेली माहिती आणि त्याच बरोबर आलेली 'प्रश्न पत्रिका', सर्वोच्च शिखर!  म्हणजे चढायला वेळ किती लागणार? पाण्याची सोय काय? ऊन लागणार ? आपली चालण्याची क्षमता काय? जेवण कस देणार ? न्याहरीची व्यवस्था काय? ह्या प्रश्न पत्रिकेची 'उत्तरे' म्हणजे आम्ही सगळे, आमच्यातली एकेक एक व्यक्ती....१५ मार्कांच्या प्रश्नाला १५ पैकी १५ मिळवून देणारे.....साहजिकच आम्हाला प्रश्नांना त्याच ताकतीने 'उत्तर पत्रिका' ही तयार झाल्या...त्यातूनच कळसूबाई चा ट्रेक....आम्ही १३ नोव्हेंबर आणि १४ नोव्हेंबर ला ठरवला.... ट्रेक आम्ही पहिल्यांदाच रात्री करणार होतो....जेवण २ वेळा "श्री हरी" मध्येच करणार होतो. बस पहिल्यांदाच लोकांना त्यांच्याच दारातून 'घेणार' होती....   एकतर चढाई मुळे दमछाक होणार..होती, त्यात उन्हाचा तडखा नको म्हणून मग चढाई रात्रीच करायच ठरलं आणि  कळसूबाई शिखर वरून होऊ घातलेला "सूर्योदय....", उन्हाच्या तडाख्यापेक्षा मला "सूर्योदयच" जास्त खुणावत होता. किंबहुना तोच माझ्या उत्सुकतेचा विषय होता.... त्यामुळे त्याला पाहायचच! ह्याच निर्धाराने मी कामाला लागलो.... सगळ्या कामांसाठी लागणारा "स्पार्क" बहुदा तो सूर्योदयच होता....अस म्हटलं तर ते वावग ठरणार नाही.... ठरल्याप्रमाणे बस हडपसर ला पोहचली दुपारी १.३० वाजता , क्या बात! प्रत्येक वेळी अहो कधी पोहचताय? कुठे आहात...? विचारावं लागत होत...आज मात्र ड्रायव्हर चा फोन आला... "साहेब, मी पोहचलो" पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही... हडपसर मधून बसणारी मंडळीच रद्द झाली ...आणि हे बस जागेवर पोहचल्यावर कळत होत...हो नाही, हो नाही म्हणता म्हणता...शेवट बस ड्रायव्हर ला सांगितलं..तुम्ही पुढच्या ' स्टॉप ' वरच्या मंडळींना घ्या....अस करत करत बस पोहचली  तळेगाव ला...आम्ही बसलो....आणि पुढचा प्रवास सुरू झाला.... वाटेत नाच गाणं तुफान जोमात चाललेलं, मी ही त्यात सहभागी होत होतो...पण लक्ष मात्र... कामाकडे होत "श्री हरी पांडुरंग" ला पोहचल्या नंतर... जेवणाची लगबग चालली होतीच हे सगळं सुरू असताना  आमच्या सचिन शेठ नावाच्या अवलिया ने शक्कल काढली हॉटेल मालकांचा "सत्कार" करायची. खरतर ती व्यक्ती त्या सत्कराची हकदार सुद्धा होती एवढी वर्ष आम्हाला ते कुठलेही आधेवेढे न घेता आपल्या चविष्ट पदार्थानी तृप्त करताय.... मग सत्कार तर करावाच लागणार होता , सत्कार झाल्यावर हातात वेळ होता म्हणून तिथेच सर्वांच्या परिचयाचा एक कार्यक्रम करावा अस सुचवलं...पण इतर सदस्यांच्या नकार मुळे तो विषय बारगळला...कारण माझा अंदाज होता की  पुढें जाऊन तो 'वेळ' मिळणार नाही.....रात्रीच जेवण झालं आणि बस निघाली... पुढच्या प्रवासाला ....इथे आम्ही सर्वांना झोपायला सांगितलं कारण...पुढे  शिखर चढाई , सूर्योदय,उतराई असा भरभक्कम प्लॅन होता...निघताना मी कोणत्या रस्त्याने जायचं ह्याची स्पष्ट कल्पना दिली असतानाही आमची गाडी वळली दुसरीकडे...ही गोष्ट माझ्या लक्षात आली तीच.... मुळी गाडी थांबल्यावर... शेजारी बसला  खेटून असणारी घर पाहताक्षणी लक्षात आलं की... ठरलेला रस्ता ....धरलाच नाही...मग मात्र चिडचिड व्हायला लागली... माझी ह्या सगळ्यांवर खूप साधी अपेक्षा होती....एखादी व्यक्ती ज्यावेळी सांगतीये तर...तिने पुढचा मागचा विचार करूनच सांगितलेलं असते.... "जरुरी नाहीये की...तोच अंतिम निर्णय असावा...पण त्यावर उपोरक्त परिस्थिती चा विचार तरी किमान असावा".....मी माझी नाराजी मंदार समोर व्यक्त सुद्धा केली कारण विषय हा संपूर्ण वेळेची शिस्त पाळण्या संदर्भातला होता.... असो पण गाडी मूळ रस्त्याला लागली....आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला... अकोलेच्या पुढे मात्र निशिबाने आमच्या वर मेहेरनजर केली....आज एवढ्या वर्षानंतर आम्ही ते पाहिलं जे पाहण्यासाठी आमचे डोळे आसुसलेले होते.... बिबट्या! सुरवातीला तो मंदारला दिसला...मग आम्हाला! जीवन सार्थकी लागल्याचा अनुभवत होतो आम्ही......पाठोपाठ ३ बिबट्यांनी दर्शन दिलं....काहीजण म्हणतात ४ होते...मी मात्र ३च पाहिले आणि ह्याच दर्शना बरोबरच जवाबदारी आणि भीतीची जाणिव अशा एकत्रित भावना मनात तयार झाल्या .... कारण बिबट्याच्या दिसण्याने बस मध्ये गोंधळ आणि आवाज वाढला होता...शांत करणं गरजेचं होत ....आणि भीती ह्या साठी होती...की जे दृश्य मी आता पाहत होतो....हेच आणि अगदी हेच दृश्य ट्रेकच्या दीड दोन आठवडे आधी माझ्या  imagine केलं होतं...जिने मला अस्वस्थ केलं...आणि इथे त्याची सुरूवात मी पाहत... होतो....जे दृश्य दोन आठवडे imagine केलं होतं ते सगळं च्या सगळं काही घडलं नाही सुरुवातीच्या काही भागाने... मला मात्र काळजीत नक्कीच टाकलं होतं माझ्या चेहेऱ्यावर ची काळजी इतकी स्पष्ट दिसत होती....की मंदार ,तेजस....रोहन त्यांना सुद्धा फक्त माझ्या चेहऱ्यावर वरच्या उडलेल्या रंगाने लक्षात.... आलं असो...जे imagine केलं होतं ते झालं नाही ह्याच समाधान तर आहेच...पण बिबट्याने आमचे पैसे वसूल करुन दिले हे मात्र नक्की मान्य करावे लागेल....आणि गाडी बारी ला पोहचली....बारी हे पायथ्याचे गाव .
                      साधारण पहाटेचे ३.०० वाजले असतील....पण शिखराच्या वाटेवर आम्हाला टॉर्च दिसत होते...आणि आलेल्या गाड्या , ह्या अंदाजावरून बरीच मंडळी ट्रेकला आली होती. आवश्यक ते समान जवळ बाळगायला सांगून आम्ही सगळ्यांनी चालायला सुरूवात केली....आधी गावातून...मग गाव संपून शेत लागलं अंधार असल्यामुळे दिसायला मर्यादा होत्याच पण त्यातुनही आम्ही चालत होतो...साधारण २० मी. चढाई सुरु झाली. वास्तविक ज्या हॉटेल मध्ये आमचे जेवण सांगितलं होत...ते "अर्ध्या तासावर आहे" अस आतापर्यंत बोलण्यात आल होत.....पण त्या चढाई ने चांगलाच "वेळ" घेतला, कदाचित पडलेला खंड आणि मोडलेली सवय हे सुद्धा कारण असू शकतात..... अंधार असल्यामुळे कोण कुठे आहे....हे माहीतच नव्हतं ...एवढच माहीत होत की....सगळ्यात शेवट मी आहे... माझ्या मागे "आमच्यापैकी" कुणीही नाही. चढाई करत असताना काही जुन्या केलेल्या ट्रेकचा "ठेवा" हा आठवणीची 'शबनम' देत होती.... हरिहर, हरिश्चंद्र, सांधण व्हॅली केंजळगड,धोडप असे किल्ले त्या 'शबनम 'मधून बाहेर आलेले होते....आणि आम्ही कळसुबाई च्या पहिल्या मंदिराजवळ पोहचलो...म्हणजे पहिला टप्पा पूर्ण केला होता. हे मंदिर ज्यांना शिखराच्या माथ्यावर पोहोचता येत नाही.... त्यांच्यासाठी सोय म्हणून बनवलेलं आहे.... परिसर तसा बऱ्यापैकी मोठा आहे,त्याच बरोबर ह्याच मंदिरामध्ये देवी कळसूबाई चा उत्सव सुद्धा केला जातो....असे दशरथ कडून समजले, दशरथ खाडे   आमचा शिखर कळसूबाई मधील "अन्नदाता" खरतर हा पठ्या महाराष्ट्र पोलीस दलात आपली सेवा देतो आणि त्याचा परिवार ह्याच कळसुबाई वर भुकेलेल्या लोकांना अन्न पुरवतात आम्ही येणार म्हणून...तो सुद्धा त्याची "पोस्टिंग" असलेल्या ठिकाणाहून इथे आला होता...तेही त्याच रात्री, 
तो आणि त्याचे कुटुंब खूप डाऊन टू .... होत आम्ही सर्वजण चहा पिण्यासाठी म्हणून थांबलो एव्हाना अंगावरचं एक "आवरण" रिकाम आणि आमच्या ट्रेकच एक "आवर्तन" पूर्ण झालेलं होत.
(साभार ट्रेकक्षितीज संस्था)
उपलब्ध नोंदी नुसार कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६९० मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली मी येताना पाहिली होती. 
चहा पिऊन झाल्यावर आम्ही सर्वांनी पुढची चढाई सुरू केली....अंधारच होता...त्यामुळे बाकी दिसत नव्हतं पण वरच्या दिशेने येणाऱ्या टॉर्च मुळे तिथेच जायचं आहे....हे माहीत होत माझ्या बरोबर गेंगजे काका,अमृता - आश्विन ,प्रियादिदी तिची मुलगी काव्या, सुशांत- दीपा त्यांची मुलगी परी,मित्र निखिल, सुवर्णा , रोहन - अनुजा एवढे होते बाकी सगळेच पुढे गेलेले होते...काव्या मस्त चालली होती....तिचा उत्साह आम्हाला लाजवेल असाच होता...आणि हे मान्य करायलाच हवं कारण आमची जी काही दमछाक झाली होती....की विचारायची सोय नाही एके ठिकाणी पडवी वजा छत होत त्याठिकाणी मंदार बरोबर असलेली राधा आमच्या कडे आली...आणि तिथे आम्ही थांबलो... अमृता- आश्विन च हे कन्यारत्न भारी हौशीच पण बहुतेक प्रवास आणि बस मधील मस्ती ह्या सगळ्या मुळे दमली होती....त्यात आम्ही बरचस वर चढल्या मुळे गार हवा सुद्धा झोंबायला लागली होती बिचार! चार वर्षांचं लेकरू तिच्याकडून अपेक्षा काय ठेवणार, आमचीच.... हालत खराब होत आली होती...बाबाच्या कुशीत हे लेकरू झोपल तेही काही मिनटात....आता राधा बरोबर अमृता अश्विन आणि रोहन ...रोहन हे दुसरं लेकरू! हेही थांबल मी मात्र वर जायला निघालो कारण "सूर्योदय" पाहायचा होता. तेच तर टार्गेट घेऊन आलो होतो मी.. उरलेली मंडळी घेऊन पावले पडायला लागली.....ह्या कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करता येणे सहज शक्य झालेलं आहे. चालणाऱ्या पावलांबरोबर निसर्ग सुद्धा जागत होता...अधून मधून गावातील कोंबड्यांचा बांग देताना चा आवाज हलकासा कानावर येत होता. मध्येचं पडव्यावजा छत दिसत, ती म्हणजे  इथे दिवसा व्यवसाय करणाऱ्यांची होती... पहाटे तिथे कोणी असण्याचा प्रश्नच नव्हता... पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत, ती कळसूबाईची पावले आहेत अशी श्रध्दा आहे.....पुढे मी वर चढून एक पॉइंटला थांबलो एव्हाना मला माहित झालं होत की मी शेवट पर्यंत जाऊन सूर्योदयाचा आनंद घेऊ शकत नाहीं.... धुकं आणि एकूणच वातावरणाच बदलत रुपड पाहता सुर्योदय वर पाहता येईल ह्याची शक्यता दिसत नव्हती....आणि घड्याळाची वेळ पाहता सूर्योदय केव्हाही होईल...आणि ही संधी मला गमवायची नव्हती मी त्याच जागेवर....जवळ जवळ अर्धा तास बसून होतो "अर्द्य" देण्यासाठी.... अनुजा,दीदी, सुवर्णा ह्या पोरी सुद्धा पुढे गेल्या.... शेवटी त्या सूर्य नारायणाने आपले दर्शन दिलेआणि मी "अर्द्य"
हवे होते ते फोटो काढून मी निघालो... खरतर वाटल पोहचलो म्हणुन...त्या नंतर सुद्धा बरच अंतर शिल्लक राहिलं होत.... शेवटच्या शिडीच्या खाली विहिर व बाजूला एक पत्र्याची शेड होती.....आणि शिडी दिसली.... मी शिडी जवळ पोहचलो त्यावेळी आमच्यातले माझा भाऊ प्रथम, सागर, निशा, समृध्दी,श्रावणी, सिद्धू अशी बरीचशी मंडळी परत उतरताना दिसली... मी शिखरावर पोहचलो आसपासचा परिसर मात्र मला दिसत नव्हता... कारण धुकच प्रचंड होत अर्थात ह्याची कल्पना मला आलीच होती....सूर्योदय पाहायचा म्हणून मी मनमोहून टाकणारा आजूबाजूचा परिसर पाहता येणार नाहीं..ह्याची तयारी केलीच होती आणि त्याची खंत सुद्धा नाहीं...कारण आपण ज्यासाठी प्रयत्न करतो ते सगळंच आपल्याला मिळतंच अस नाहीं आणि त्यासाठीचा प्रवास देखील वेडेपणा, हे आजवरच्या वाटचालीत लक्षात आलं आहे.... असो मी देवीच दर्शन घेतलं आणि तीच्याबदलची कृतज्ञता व्यक्त करुन....मी न्याहारी साठी बसलो, दिपाने स्वतःच्या हाताने बनवलेली खोबऱ्याची चटणी.... म्हणजे कमालच! बरोबर आणलेले पराठे, चकली चिवडा आणि चटणी अस पोटभर नाष्टा केल्यावर मात्र थंडी वाजायला लागली आणि आम्ही खाली उतरायला सुरुवात केली.थोड खाली उतरल्यावर....खालचा परीसर दिसत होता.... काही घर दिसत होता....पण ती इतकी छोटी होती...एक वार मनात विचार येऊन ही गेला ह्या जगात ह्या "गोष्टी" खूप छोट्या आणि किरकोळ आहे...म्हणजे मी सुद्धा एक ' पार्टिकल ' सुद्धा नाहीये ह्या जगाच्या पाठीवर आणि हे शिखर ताठ मानेने उभे आहे...आम्ही परत राधा आणि अमृता अश्विन होते तिथे आलो...१५-२० मी आराम करुन परत... दशरथ कडे आलो...कारण जेवायचं होत...उत्तम अशा जेवणावर ताव मारून.... दुपारी परत उतरायला सुरूवात केली...कारण "रंधा" गाठायच होत. आणि पुढे परत तळेगाव 
रंधा धबधबा पाशी पोहचलो काही आले काही आलेच नाही... आणि गाडीने आपला परतीचा प्रवास सुरू केला....
ह्या ट्रेकमध्ये तस पाहायला गेलं बिबट्याच झालेलं दर्शन, खूप दिवसांनी पुन्हा एकदा आलेली ही मंडळी,बस मधलं मस्तीच वातावरण, सूर्योदय ह्या सगळ्या गोष्टीच समाधान होतंच... तसच काही गोष्टीबाबत मला मात्र विचार करायला लावणाऱ्या होत्या मैत्रिणीच हरवलेल सोन्याचं लॉकेट, रस्ता पूर्व निर्धारित असतानाही मध्येचं तो बदलल्यामुळे खर्च झालेला वेळ..... मित्रांना ट्रेक पूर्ण  न करता आल्याची सल ,बस दारात असतानाही काही मंडळींनी रद्द केलेला ट्रेक ह्या सर्व गोष्टींचं नाही म्हटलं तरी वाईट वाटतच....कारण गेली काही वर्ष मी आणि माझे मित्र ह्या सर्व गोष्टींचां भाग आणि व्यवस्थापन आमच्या केंद्रस्थानी राहिलेल आहे... त्यामुळे मला वाईट वाटण तस स्वाभाविकही आहे... ह्याची मला जाणीव आहे आणि ती माझी जवाबदारी सुद्धा आहे. 
थोड्याशा प्रगल्भ विचाराने घडलेल्या गोष्टींवर आपण नियंत्रण मिळवू शकतो कारण आम्ही सर्व मित्र ह्या गोष्टींसाठी सक्षम, जागरूक आणि सजग आहोत...ह्याच विचारात असताना गाडी तळेगावात पोहचली आणि आमचा हा ट्रेक पूर्ण झाला...ह्या लिखाणाचं प्रयोजन इतकचं की.. लिखाणातून तो "वेळ" आपण पुन्हा एकदा नव्याने जगतो....आणि अनुभव आयुष्याला संपन्न करत ,साजरा करत....

काही महत्वाच्या नोंदी..
पोहोचण्याच्या वाटा :
या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदर्‍यापासून ‘बारी’ हे गाव अवघ्या ६ कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदर्‍याला जाणार्‍या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात.
स्वत:चे वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरुन भंडारदर्‍याला जातांना, भंडारदर्‍याच्या अलिकडे ६ कि.मी अंतरावर ‘बारी’ हे गाव आहे.
राहाण्याची सोय :
येथे शिखरावर रहाण्याची सोय नाही. शिखरा खालील शेडमध्ये किंवा भंडारदर्‍याला राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
बारी गावात/ भंडारदर्‍याला जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
शिखरावर जाताना शेवटच्या टप्प्यावर शिडीच्या अगोदर एक विहीर आहे. वाटेत पाणी मिळत नसल्याने बारी गावातच पाणी भरून घ्यावे.

धन्यवाद.

(तपशील वार नोंदी साठी trekkshitiz ह्या संकेस्थळावर भेट देऊ शकता.)

Comments

Popular posts from this blog

सांधण व्हॅली... प्रथम चरण

आठवणीतला 'राजमाची'

रौद्र की रुद्र (कोकणकडा सफर)